
औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी रायगडावरची शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांना तुम्ही आता ब्राम्हण म्हणून बघणार आहात का?, असा सवालही केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण तापले आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्र्यांसह, संभाजी ब्रिगेडने या विधानावरुन जोरदार टीका केली. याबाबत आता श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने लोकमान्य टिळक यांच्या पुढाकारामधूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने झाले आहे. त्यावर कोणीही राजकारण करू नये, अशी भूमिका श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. या पत्रकार परिषदेला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, माजी अध्यक्ष जगदीश कदम आणि लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक उपस्थित होते.