मुंबई : गेल्या दोन वर्षांत विविध परिसरातून चोरीसह हरविलेले सुमारे २८ लाख रुपयांचे मोबाईल, लॅपटॉप, वाहन, चांदीची मूर्ती शनिवारी एका कार्यक्रमांत साकीनाका पोलिसांनी त्यांच्या मूळ मालकांना परत केला. चोरीसह हरविलेला मुद्देमाल परत मिळाल्याने या सर्वांनी साकीनाका पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे. २०२२ आणि २०२३ साली विविध परिसरात काही तक्रारदाराचे मोबाईल, लॅपटॉप, वाहन, मंदिरातील चांदीची मूर्ती आदी मुद्देमाल चोरीसह गहाळ झाले होते. साकीनाका पोलिसांच्या विशेष पथकाने तांत्रिक माहितीवरुन काही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा बहुतांश मुद्देमाल जप्त केला होता. आरोपींच्या अटकेसाठी तसेच मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी साकिनाका पोलिसांचे पथक मुंबईसह पालघर, मिरारोड, कर्नाटक, उत्तरप्रदेश, कोलकाता आदी ठिकाणी गेले होते. गेल्या दोन वर्षांत हरविलेले तसेच चोरी झालेले शंभरहून मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आले. या मोबाईलसह लॅपटॉप, मंदिरातील देवाची चांदीची मूर्ती, वाहने आदी मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. यावेळी उपायुक्त दत्ता नलावडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे यांच्यासह योगेश शिंदे, राजेंद्र नागरे, दिपक कदम, चंद्रकांत पवार, रिकी सौदरमल, परेश शिगवण, अनिल करंडे, अय्याज शेख आदी पोलीस पथकाचे कौतुक केले होते.