मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर आकाश सिंग नावाच्या एका २८ वर्षांच्या तरुणाने शुक्रवारी रात्री उशिरा उडी घेऊन आत्महत्या केली. मोबाईल पडल्याचा बहाणा करून तो टॅक्सीतून खाली उतरला आणि काही कळण्यापूर्वीच त्याने सी -लिंकवरून समुद्रात उडी घेतली होती. या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही; मात्र मानसिक तवाणातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
आकाश हा परळ येथे त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. तो सध्या एका खासगी बँकेत कामाला होता. शुक्रवारी तो टॅक्सीतून वांद्रे- बीकेसी येथून घरी जाण्यासाठी निघाला. त्याने टॅक्सीचालकास सी -लिंकवरून टॅक्सी घेऊन जाण्यास सांगितली. यावेळी तो टॅक्सीत कोणाशी तरी बोलत होता. काही वेळानंतर त्याने टॅक्सीचालकाला मोबाईल पडल्याचे सांगून टॅक्सी बाजूला घेण्यास सांगितले. टॅक्सी थांबताच तो खाली उतरला आणि त्याने सी लिंकवरुन समुद्रात उडी घेतली. ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक मच्छिमाराच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला होता. काही वेळानंतर त्याचा मृतदेह मच्छिमारांना सापडला. त्याच्याकडे पोलिसांकडे सुसाईट नोट सापडली नाही.
ब्रेकअप झाला म्हणून समुद्रात घेतली उडी
आकाशचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते; मात्र तीन महिन्यांपूर्वीच त्याचा ब्रेकअप झाला होता. त्यातनू तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता, त्यातून त्याने सी लिंकवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जाते; मात्र या वृत्ताला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही. याप्रकरणी वरळी पोलिसांनी एडीआरची नोंद करून आकाशच्या कुटुंबीयांसोबत नातेवाईकांची जबानी नोंदवून घेतली आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही.