
‘जेईई-मुख्य’ परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी ‘एनटीए’ने जाहीर केला असून या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. दोन सत्रात झालेल्या ‘जेईई-मुख्य’ परीक्षेला एकूण नऊ लाख विद्यार्थी बसले होते.
१०० टक्के गुण मिळवणाऱ्या २४ विद्यार्थ्यांमध्ये श्रेणिक मोहन साकला (महाराष्ट्र), नव्या, मयांक मोटवाणी, कृष्णा शर्मा व पार्थ भारद्वाज (राजस्थान), सार्थक माहेश्वरी (हरयाणा), स्नेहा पारीक (आसाम), अरुदीप कुमार (बिहार), मृणाल गर्ग (पंजाब), कोयना सुहास, रवी किशोर, मेंडा हिमा वामसी, पल्ली जलजक्शी व कार्तिकेय (आंध्र प्रदेश), रूपेश बियाणी, धीरज, जस्ती यशवंत (तेलंगणा), शिवा नागा वेंकट आदित्य, अनिकेत चट्टापाध्याय, थॉमस बिजू (केरळ), बोया हरेन सात्विक (कर्नाटक), कुशाग्र श्रीवास्तव (झारखंड), कनिष्क शर्मा व सुमित्रा गर्ग (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.
भारताव्यतिरिक्त परदेशातील दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, कुवैत, लागोस, कोलंबो, जाकार्ता, व्हिएन्ना, मॉस्को व बँकॉक या शहरांमध्येही ही परीक्षा घेण्यात आली होती. जेईई-मुख्य परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई-ॲडव्हान्स्ड परीक्षेत बसता येणार आहे. या परीक्षेतही चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील ‘आयआयटी’सह नामवंत अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे.
अमरावतीचा श्रेणिक साकला
‘जेईई’मध्ये राज्यात अव्वल
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या ‘जेईई-मुख्य सत्र २’ च्या परीक्षेत अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी श्रेणिक मोहन साकला हा १०० टक्के गुण मिळवून राज्यात अव्वल आला आहे. या परीक्षेत देशभरातून २४ विद्यार्थी अव्वल आले असून, त्यात श्रेणिकचा समावेश आहे. श्रेणिकची ‘आयआयटी’मधून पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून ‘कॉम्प्युटर सायन्स’मध्ये आपल्याला उच्चशिक्षण घ्यायला आवडेल, असे श्रेणिकने सांगितले. श्रेणिकने सीबीएसई इयत्ता बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात ९९ टक्के, तर गणितात ९८ टक्के गुण मिळवले होते. श्रेणिकचे वडील मोहन साकला हे शेती करतात.