
हैदराबाद : ओटीपी सांगा... तुम्हाला १०० कोटींची लॉटरी लागली... तुम्हाला बोनस मिळाला... आदी खोटे संदेश पाठवून भारतीयांचे ७०० कोटी लुटणारे चिनी रॅकेट हैदराबाद पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. एका वर्षात या रॅकेटमधून १५ हजार भारतीयांना गंडा घातला होता.
हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, ही चोरलेली रक्कम दुबईच्या मार्गाने चीनला पाठवली जात होती. या घोटाळ्याशी संबंधित क्रिप्टो वॉलेट व्यवहारांचा संबंध लेबनॉन येथील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहशी जोडले आहेत. त्यातून दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करण्यात येत होता.
या ऑनलाईन चोरट्यांची मोडस ऑपरेंडी सांगताना हैदराबाद पोलिसांनी सांगितले की, लोकांना रिव्हू करण्याच्या बहाण्याने त्यांची फसवणूक केली जात होती. आतापर्यंत देशात ९ जणांना अटक झाली आहे. ४ जण हैदराबादचे, ३ मुंबईचे, तर २ जणांना अहमदाबादहून अटक झाली. हे सर्वजण चिनी हँडलर्सच्या इशाऱ्यावर काम करत होते.
हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद म्हणाले की, आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांना सतर्क केले आहे. तसेच केंद्रीय गृहखात्याच्या सायबर गुन्हे विभागाला सर्व माहिती दिली आहे. पोलीस या प्रकरणी आणखी ६ आरोपींचा शोध घेत आहेत.
सायबर गुन्हे पोलिसांनी हैदराबादच्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. त्याच्या तपासात हे प्रकरण बाहेर आले. एका व्यक्तीला टेलिग्रामवर रिव्हू करण्यासाठी अर्धवेळ नोकरीचा जॉब मिळाला होता. त्याने वेबसाइटवर नोंदणी केली. त्याला हजार रुपये गुंतवायला सांगितले. त्याचबरोबर अनेक वस्तूंना रेटिंग देण्याचे काम दिले. त्याला ८०० रुपयांचा नफा झाला. त्यानंतर त्या व्यक्तीला २५ हजार गुंतवायला सांगितले. त्यात त्याला २० हजार नफा झाला. मात्र, त्याला पैसे काढण्याची परवानगी मिळाली नाही. त्यानंतर जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम गुंतवली. मात्र, हे पैसे परत मिळाले नाहीत. अशा तऱ्हेने या व्यक्तीकडून २८ लाख रुपये उकळण्यात आले.
२८ लाख रुपये ६ बँक खात्यांत हस्तांतरित केले
२८ लाख रुपये ६ बँक खात्यांत हस्तांतरित केल्याचे तपासात पोलिसांना आढळले. ही रक्कम भारतातील विविध बँक खात्यात हस्तांतरित झाली. त्यानंतर ती रक्कम दुबईला पाठवली. तेथे क्रिप्टोकरन्सी विकत घेतली. तेथून हे पैसे चीनला पाठवले जात होते.
भारतीय बँकांमध्ये ४८ बँक खातीही बनावट कंपन्यांच्या नावावर उघडल्या होत्या. त्यावेळी हा घोटाळा ५८४ कोटींचा असेल, असे तपास यंत्रणांना वाटत होते. प्रत्यक्षात तो ७०० कोटींचा होता. जी भारतीय बँक खाती भारतीय सिमकार्ड वापरून उघडली होती. तिला दुबईतून रिमोट पद्धतीने ऑपरेट करण्यात आले. हे सर्व चोरटे चीनच्या हँडलरशी संपर्कात होते. हे या घोटाळ्याचे मास्टरमाइंड आहेत.
चिनी हॅकर्स ६५ खाती सांभाळत होते
चिनी मास्टरमाइंड केविन जून, ली लू लँगझाऊ, शाशा हे तिघेजण ६५ अकाऊंट सांभाळत होते. त्यातील १२८ कोटींची रक्कम हस्तांतरित केली.