आयपीएल २०२२च्या सांगता समारंभात रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी

आयपीएल २०२२च्या सांगता समारंभात रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी

अहमदाबादेतील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल २०२२च्या सांगता समारंभात रविवार, २९ मे रोजी छऊ नृत्य अर्थात मुखवटा घालून केलेल्या नृत्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी होणाऱ्या पारंपरिक सांगता सोहळ्यात रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. या सोहळ्यात बॉलीवूडचे कलाकार सहभागी होणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी ६.३० मिनिटांनी सुरू होणार आहे. हा सोहळा सुमारे ५० मिनिटे चालणार आहे.

गेली काही वर्षे आयपीएलचा समारोप सोहळा करण्यात आला नव्हता. या आयपीएलमध्ये उद्घाटन सोहळाही करण्यात आला नाही. सांगता सोहळ्यात छऊ नृत्याचा आविष्कार घडविण्यासाठी झारखंडहून नर्तकांचा गट अहमदाबादकडे रवाना झाला आहे. सुदूरवर्ती गाव चोगामध्ये राहणारे प्रभात कुमार महतो हे १० नर्तकांसोबत नृत्यकला सादर करणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) या टीमचा येण्या-जाण्याचा खर्च करणार आहे. हा गट मानभूम छाऊ सादर करणार आहे.

छऊ ही १२०० वर्षे पुरातन कला आहे. छऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून प्रामुख्याने वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो.

सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते. हे नृत्य तीन रात्री चालते. याच्या साथीला नगारा, मृदंग, बासरी आदी वाद्ये असतात. यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्येही सादर केली जातात. या नृत्यात गती, उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.

प्रत्येक छऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहीत असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नर्तकाने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे असते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in