
नवी दिल्ली : देशातील सर्व बँकांचा आठवडा लवकरच पाच दिवसांचा होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. येत्या २८ जुलैला याबाबत निर्णय होऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. इंडियन बँकिंग असोसिएशन पुढील शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनशी चर्चा करणार आहे. त्यात पाच दिवसांच्या आठवड्याचा निर्णय होऊ शकतो.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्ससोबत झालेल्या चर्चेत ५ दिवसांच्या आठवड्याबाबत चर्चा झाली होती. इंडियन बँक असोसिएशनने हा मुद्दा विचारार्थ असल्याचे सांगितले होते. याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी बँकांच्या युनियननी केली. त्यामुळे तात्काळ पाच दिवसांचा आठवडा ही योजना अंमलात आणता येऊ शकेल. हा निर्णय झाल्यास बँक कर्मचाऱ्यांच्या दैनंदित कामाची वेळ ४० मिनीटांनी वाढवली जाईल. त्यामुळे २८ जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. या निर्णयाला केंद्रीय अर्थ खाते व रिझर्व्ह बँकेची मंजुरी आवश्यक आहे.
सध्या दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी बँका सुरू असतात. आता आठवड्यातून पाच दिवस त्या सुरू राहाव्यात, अशी मागणी येत आहे. यापूर्वी एलआयसीत पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे.