
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईदरम्यान झालेल्या चकमकीत मोठे यश मिळवले असून, ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शुक्रवारी कुपवाडा इथे सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. सुरक्षा दलांनी परिसरात घेराव घातल्यानंतर चकमक सुरू झाली. नंतर परिसरात तीव्र शोधमोहीम राबविण्यात आली. तसेच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे जप्त केली आहेत. यात हातबॉम्बचाही समावेश आहे.
याबाबत काश्मीरचे अतिरिक्त डीजीपी म्हणाले की, हे सर्व दहशतवादी पाकिस्तानातून भारतात घुसले होते. यासोबतच ते मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. चकमकीनंतरही या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. जेणेकरून अन्य कोणी अतिरेकी राहिल्यास त्याला पकडता येईल. काश्मीरमध्ये या वर्षातील हा सर्वात मोठा घुसखोरीचा प्रयत्न होता, जो सुरक्षा दलांनी हाणून पाडला आहे. मारले गेलेले सर्व दहशतवादी कुपवाड्यातील नियंत्रणरेषेवरून भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त डीजीपी विजय कुमार यांनी ट्विट केले की, 'कुपवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या पथकांनी नियंत्रणरेषेवर ऑपरेशन केले. या चकमकीत ५ दहशतवादी मारले गेले आहेत.
सध्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याआधी मंगळवारीही कुपवाडा येथील डोबनार माछिल भागात नियंत्रणरेषेजवळ झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. खोऱ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर, जवान अलर्ट झाले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांचा एकही मनसुबा यशस्वी होऊ न देण्यासाठी मोठी कारवाई केली जात आहे. यापूर्वी १३ दिवसांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना नियंत्रणरेषा उलटू दिली नव्हती.