नवी दिल्ली : लक्षद्वीपचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैझल यांना खुनाच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निकालावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केरळ न्यायालयाचा हा निकाल रद्द करून सहा आठवड्यात त्यावर फेरकारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे जावई मोहम्मद सालीह यांचा २००९ साली लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात लक्षद्वीपमधील कवरत्ती येथील सत्र न्यायालयाने ११ जानेवारी २०२३ रोजी फैझल आणि अन्य तिघांना १० वर्षांची कैद आणि प्रत्येकी १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरुद्ध फैझल यांनी केरळ उच्च न्यायालयात दाद मागितली होती. केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. त्याविरुद्ध लक्षद्वीप प्रशासनाने ३० जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेवरील स्थगिती रद्द केली.