
अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे ‘डीएनए’ जुळले आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात येणार असून राजकोटमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या अपघातातील मृतांची संख्या २७५ वर पोहोचली आहे. रविवारी सकाळपर्यंत २४८ मृतदेहांचे ‘डीएनए’ नमुने घेण्यात आले. त्यापैकी ३१ नमुने जुळले आहेत, त्यापैकी २० मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आले आहेत. त्यांचे मृत्यू प्रमाणपत्रदेखील देण्यात आले आहे.
रुग्णवाहिकांद्वारे मृतदेह सुरक्षितरीत्या संबंधित प्रवाशांच्या गावी नेले जात आहेत. यासाठी २३० पथके तयार करण्यात आली आहेत, जी मृतांच्या नातेवाईकांशी थेट संपर्कात आहेत. १९२ रुग्णवाहिका आणि वाहनेही सज्ज आहेत. अपघातात प्राण गमावलेल्या ११ परदेशी नागरिकांचे नातेवाईक अहमदाबादला पोहोचणार आहेत.मृतदेह ठेवण्यासाठी १७० शवपेट्या बनवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापैकी सुमारे १०० शवपेट्या वडोदराहून अहमदाबादला आणण्यात आल्या आहेत. उर्वरित शवपेट्या बनवण्याचे काम सुरू आहे.
पायलटचा शेवटचा संदेश उघड
अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात विमानाचा पायलट सुमित सभरवालने एअर ट्रॅफिक कंट्रोलरला (एटीसी) पाठवलेला शेवटचा संदेश उघड झाला आहे. ४-५ सेकंदाच्या या संदेशात, सुमित हे ‘मेडे, मेडे, मेडे...’ असे म्हणत असल्याचे आढळून आले आहे.