
देशभरात आजपासून जगन्नाथ रथयात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला असून, ओडिशातील पुरीसह विविध शहरांमध्ये रथयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदाबादमध्ये यंदा १४८व्या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी खाडिया येथील देसाई नी पोल भागातून ही रथयात्रा मोठ्या उत्साहात सुरू होती. मात्र, यावेळी अचानक एका नर हत्तीने नियंत्रण सोडल्यामुळे मिरवणुकीत गोंधळ उडाला. या प्रकारामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
या रथयात्रेमध्ये १८ हत्ती सहभागी होते. त्यापैकी १७ मादी हत्ती आणि एकमेव नर हत्ती होता. मिरवणूक सुरु असताना लाउडस्पीकरच्या तीव्र आवाजामुळे नर हत्ती बिथरला आणि त्याचे नियंत्रण सुटले. त्याने मिरवणुकीच्या मार्गावरून भरकटत गर्दीकडे धाव घेतली. यामुळे लोकं भीतीने पळू लागली. खाडिया परिसरातील एका अरुंद गल्लीत बिथरलेला हत्ती घुसल्याने एक व्यक्ती जखमी झाला असून, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाचे अधीक्षक आर. के. साहू यांनी सांगितले की, “प्रोटोकॉलनुसार बिथरलेल्या हत्तीला त्वरित ट्रँक्विलायझरचं इंजेक्शन देण्यात आले. दोन मादी हत्तींच्या मदतीने त्याला सुरक्षितपणे गर्दीपासून दूर नेण्यात आले. ही आमची नेहमीची आपत्कालीन कृती प्रक्रिया आहे.”
पोलिस उपायुक्त (नियंत्रण कक्ष) कोमल व्यास यांनी सांगितले की, “परिस्थिती ताब्यात आली असून, मिरवणूक नियोजित वेळेनुसार पुढे सुरू आहे.”
ही घटना घडली तेव्हा रथयात्रेचा मुख्य रथ पुढे सरकत होता आणि हत्तींची मिरवणूक सुरू होती. अचानक बिघडलेल्या परिस्थितीमुळे प्रशासनाची मोठी परीक्षा होती, मात्र पोलिस, वनविभाग आणि स्वयंसेवकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.