
अजित पवार यांनी काही आमदारांच्या पाठिंब्यावर शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे उद्या (१८ जुलै) रोजी दिल्ली येथे होणाऱ्या NDA च्या बैठकीला हजर राहणार असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली येथे मंगळवार १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या NDAच्या बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपस्थित राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केलं होतं. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीला एनडीएचे माजी घटक पक्ष असलेले शिरोमणी अकाली दलाचे (एसडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि तेलुगू देसम पार्टी;चे (टीडीपी) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी आज अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतली त्यावर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की, मी अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आम्ही त्यांना पुन्हा एकत्रित काम करण्याची विनंती केली. मात्र, यावेळी देखील त्यांनी आमचं म्हणणं फत्त ऐकूण घेतलं. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
अजित पवार यांनी रविवारी देखील त्यांच्या आठही मंत्र्यासह अचानकपणे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जात शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी देखील अजित पवार गटाकडून शरद पवार यांना पक्ष फुटू नये म्हणून एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र शरद पवार यांनी मौन धारण करत यावर कोणतही प्रत्यूत्तर दिलं नव्हतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप सोबत जाणार नसल्याचं सांगितलं होतं.