जम्मू : अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात्रा स्थगित केल्यामुळे सुमारे सहा हजार यात्रेकरू रामबन येथे अडकून पडले होते. जम्मू-काश्मीरला गुरुवारपासून पावसाने तडाखा दिल्यामुळे सर्वत्र यात्रेकरूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता, पण आता पंजतर्णी व शेषनाग छावण्यांकडून यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पंजतर्णी येथे कर्नाटकातील सुमारे ८० लोक अडकले होते. हे ठिकाण अमरनाथ गुहेपासून अवघ्या सहा किमी अंतरावर आहे, मात्र आता हवामानात सुधारणा झाली असून प्रशासन परिस्थिती रुळावर आणण्यासाठी नेटाचे प्रयत्न करीत आहे, असे रामबनचे आयुक्त मुस्सारत इस्लाम यांनी सांगितले आहे.