
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष इंडिया आघाडीशी बांधील असून फुटून बाहेर पडणार नाही, असा विश्वास शुक्रवारी व्यक्त केला. काँग्रेसचे पंजाबमधील आमदार सुखपाल सिंग खैरा यांना ड्रग प्रकरणात अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी हे विधान केले आहे.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक असलेले केजरीवाल म्हणाले, पंजाबमध्ये काँग्रेस आमदाराची अटक झाली असली तरी त्याचा इंडिया आघाडीवर परिणाम घडून येणार नाही. आम आदमी पक्ष आघाडीच्या धर्माशी बांधील आहे. आपण या अटकेबाबत ऐकले आहे, पण त्याबाबतचा तपशील समजलेला नाही. त्यासाठी पंजाब पोलिसांसोबत बोलावे लागेल. पंजाबमधील भगवंत मान सरकार राज्यातील ड्रग राज संपवण्यास बांधील आहे. कारण ही नशा राज्यातील तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहे. यासाठी कुणी प्रभावी व्यक्ती असो वा छोटी-मोठी व्यक्ती असो, कुणालाही सोडले जाणार नाही. मी कुणा ठरावीक घटनेबाबत बोलत नाही. कारण त्या घटनेचा तपशील माझ्याकडे नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवार इंडिया आघाडीने अजून जाहीर केला नाही. त्याबाबत विचारले असता केजरीवाल म्हणाले की, आम्ही अशी व्यवस्था निर्माण करू की १४० कोटी नागरिकांना वाटेल की ते पंतप्रधान आहेत. आपणास जनतेच्या हाती सत्ता द्यायची आहे. कुणा एका व्यक्तीच्या हाती नाही, असे केजरीवाल यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, पंजाब काँग्रेसने २०२४ निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत युतीची शक्यता आधीच फेटाळून लावली आहे.