बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू ;छत्रपती संभाजीराजे

 बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू ;छत्रपती संभाजीराजे

राज्यसभेच्या जागेवरून बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजेंनी सोमवारी केला.शिवराज्याभिषेक दिन उत्सवाचे आयोजन दुर्गराज रायगड समितीच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “आपला सन्मान राखला जाईल तिथेच थांबायचे, वाकायचे नाही, ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली आहे. त्यांनी अनेक तह केले; पण तह करताना स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. त्यांना सत्ता नको होती. स्वराज्य पाहिजे होते. हे स्वराज्य पुन्हा उभे करायचे आहे. आदिलशाह आणि मुघलांनी शिवाजी महाराजांची घोडदौड थांबविण्यासाठी शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. शहाजीराजांवर दबाव टाकला जात होता. काळ बदलला असला, तरी आजही सत्तेसाठी तशीच दबंगगिरी सुरू आहे. राज्यसभेच्या जागेवरून सत्तेसाठी बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

रायगड किल्ल्यावर ढोल-ताशांचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखानाद यांच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ल्यावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पंचामृत, सप्तगंगा स्नान अभिषेकानंतर महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. शिवआरतीचे पठण करण्यात आले.

सुवर्णमुद्रांचा अभिषेकही करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. या चैतन्यमय वातावरणात राज्यातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले होते. शंखनाद आणि तुतारीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप झाला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी शिवप्रतिमेचा अभिषेक केला. यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही यावेळी सादर करण्यात आली. तलवार, दांडपट्टे चालवून महाराजांना मानवंदना देण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in