
नवी दिल्ली : इंडिया आघाडीने देशातील १४ पत्रकारांवर बहिष्कार टाकणे, ही जणू आणीबाणीची पुनरावृत्ती आहे, अशी प्रतिक्रिया देत भाजपने पत्रकारांवरील बहिष्काराचा जोरदार निषेध केला आहे. हा दु:खदायी निर्णय घेऊन घमंडिया आघाडीने पुन्हा एकदा ते किती हुकूमशाही व दडपशाही व नकारात्मकतेचे पाठिराखे आहेत, हे दाखवून दिले आहे, अशा शब्दांत टीकेची झोड उठवली आहे.
भारतीय जनता पक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणाऱ्या अशा प्रकारच्या मानसिकतेचा तीव्र निषेध करीत आहे. घमंडिया आघाडीच्या या कृतीला आणीबाणीची मानसिकता असे नाव भाजपने दिले आहे. आम्ही सर्वांनी आणीबाणीच्या काळात ही मानसिकता अनुभवली आहे. अगदी अशाच प्रकारे आणीबाणीत प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्यात आली होती. आज घमंडिया आघाडी त्याचीच उजळणी करीत आहे. त्यांच्या या उजळणीतून माध्यमांबाबतची बदल्याची भावना दिसून येत आहे, असे भाजपचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख अनिल बालुनी यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्व माध्यमांना तसेच प्रामाणिक पत्रकारांना अशा प्रकारच्या राजकीय पक्षांचा जोरदार विरोध करण्याचे आवाहन देखील केले आहे. पत्रकारांनी समाज आणि आपला देश याप्रतीचे आपले कर्तव्य निस्पृहतेने कुणालाही न घाबरता आणि कुणाची बाजू न घेता बजावावे, असे बालुनी यांनी म्हटले आहे.