
लखनऊ : प्रियकर सचिन मीणा याच्यासाठी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर सध्या या ना त्या कारणाने सतत सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता तर तिने एक व्हिडीओ पोस्ट करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना राखी पाठवत असल्याचे सांगितले आहे. एवढंच नाही, तर तिने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा राखी पाठवली आहे. सीमा हैदरने एक व्हिडीओ पोस्ट करून राखी कुरियर केल्याचे सांगत पोस्टल स्लिप सुद्धा दाखवली.
सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील असून, ती देशात आल्यापासून ‘तीज’, ‘नागपंचमी’ यासह हिंदू सण साजरे करत आहे. १५ ऑगस्टला सीमाने तिचे वकील ए. पी. सिंह यांच्यासह नोएडा येथील तिच्या निवासस्थानी तिरंगा फडकावत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा दिल्या होत्या. आता रक्षाबंधनासाठी तिने जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या लोकांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आहे त्यांच्या हातात रक्षाबंधनाच्या दिवशीच राखी बांधली जावी म्हणून आजच राख्या पाठवत असल्याचे सुद्धा सीमा हैदरने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.