"तुमच्यासाठी वेगळा कायदा..." राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले भाजप?
@ANI

"तुमच्यासाठी वेगळा कायदा..." राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले भाजप?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींवर केलेल्या आरोपांवर भाजपने सडेतोड उत्तर दिले

आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी झालेल्या कारवाईवर पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह लोकसभा अध्यक्ष आणि उद्योगपती गौतम अदानींवर गंभीर आरोप केले. याला भाजपनेही सडेतोड उत्तर दिले आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद हे पत्रकार परिषद घेत म्हणाले की, "राहुल गांधींवर मानहानीचे ६० खटले सुरू असून त्यांनी जाणूनबुजून अशी कामे केली आहेत. त्यांनी मागासवर्गीयांचा अपमान केला आहे. देशात प्रत्येकासाठी एकच कायदा असेल तर तुमच्यासाठी वेगळा कायदा असेल का?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, "देशामध्ये असा कायदा आहे की, २ वर्षांची शिक्षा झाल्यास तुम्हाला तात्काळ अपात्र ठरवले जाते, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे काँग्रेसने राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये स्थगिती मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही. तसेच, कर्नाटक निवडणुकीत फायदा उठवण्याची सुनियोजित रणनीती काँग्रेसची आहे. त्यांना बळीचा बकरा दाखवा आणि काँग्रेसला वाचवा, असे धोरण दिसते आहेत. याचे उत्तर त्यांना द्यावेच लागणार आहे. तुम्हाला दोषी ठरवल्यानंतर वकिलांच्या फौजेने तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, राहुल गांधींच्या विधानाविरोधात भाजप संपूर्ण देशात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की, "राहुल गांधींना टीका करण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांनी मागासवर्गीयांचा अपमान केला आहे. न्यायालयाने त्यांना माफी मागण्याची संधी दिली होती, तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिला." असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in