
नवी दिल्ली : आगामी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सत्ताधारी पक्षांसह सर्वच छोट्या-मोठ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एकीकडे २६ विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपला भक्कम विरोध देण्याची तयारी करीत आहेत. त्याचवेळी भाजप देखील सडेतोड उत्तर देताना एनडीए आघाडीचा आवाका वाढवत आहे. त्यासाठी इतर पक्षांतील बडे नेते आपल्या पक्षात सामील करून घेण्याचा एक मास्टर प्लॅन भाजपने तयार केला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या वृत्तानुसार, सपा आमदार दारासिंह चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभासपा अध्यक्ष ओ. पी. राजभरही आता भाजपसोबत आहेत. याशिवाय, २४ जुलैला सपा आणि आरएलडीचे अनेक नेते भाजपमध्ये सामील होणार आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएलडी नेते आणि माजी खासदार राजपाल सैनी भाजपमध्ये सामील होऊ शकतात. यांच्याशिवाय माजी मंत्री साहब सिंह सैनी देखील भाजपमध्ये प्रवेश घेऊ शकतात. सपा नेते जगदीश सोनकर, सपा नेते सुषमा पटेल, गुलाब सरोज आणि माजी आमदार अंशुल वर्मा हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.