
दिल्लीतील केजरीवाल सरकार पाडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
भाजपचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुरुवारी ‘आप’च्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर दिल्लीतील सरकार स्थिर असून कोणताही आमदार फुटणार नाही, असा विश्वास ‘आप’ने व्यक्त केला आहे. मात्र, या बैठकीला काही आमदार अनुपस्थित होते. या आमदारांशी फोन कॉलद्वारे चर्चा झाल्याचे आपतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, ‘आप’चे बरेचसे आमदार ‘नॉट रिचेबल’ असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने केजरीवाल सरकार पडणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र,‘आप’ने या वृत्तात तथ्य नसल्याचे सांगत सरकार स्थिर असल्याचा दावा केला.
अरविंद केजरीवाल यांनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीला ६२ पैकी ५३ आमदार उपस्थित होते. तर अनुपस्थित आमदारांपैकी काही आमदारांशी संपर्क करण्यात आल्याचे ‘आप’कडून सांगण्यात आले. यापैकी दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष सध्या विदेशात आहेत. मनीष सिसोदिया हिमाचल प्रदेशमध्ये आहेत, असे ‘आप’ पक्षाकडून सांगण्यात आले.
तर उर्वरित आमदारांशी अरविंद केजरीवाल यांनी फोनवरून चर्चा केली असून त्यांनी सरकार पाडण्यासाठी आम्हाला भाजपच्या लोकांनी संपर्क साधला होता, असे सांगितल्याची माहिती ‘आप’च्या प्रवक्त्याने दिली.
ईडी, सीबीआयचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी
आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील चार आमदारांना भाजपमध्ये सामील व्हा; अन्यथा सीबीआय आणि ईडीने लादलेल्या खोट्या खटल्यांना तोंड देण्यास तयार राहा, अशी धमकी भाजपतर्फे देण्यात आल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. आमदारांना भाजपमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येकी २० कोटी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यांनी इतर आमदारांना सोबत आणले तर २५ कोटीही देण्याचे प्रलोभन दाखवले होते. त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारून भाजपमध्ये जाणे नाकारले, तर मात्र उपमुख्यमंत्री सिसोदियांप्रमाणे त्यांना ‘सीबीआय’, ‘ईडी’च्या कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी धमकीही भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.