
मान्सून जोरदार सक्रिय असल्याने देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बिजनौर जिल्ह्यातील अनेक गावे जलमय झाली आहेत. तसेच गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच अनेक मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
दरम्यान, नजीबाबादहून हरिद्वारला जाणारी रुपहडिया डेपोची बस कोतवाली नदीत अडकल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. बिजनौरमधील भागुवाला येथील कोतवली नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली आहे. तसेच नदीतून पुराचे पाणी वेगाने वाहत आहे.
या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. नदीत अडकल्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. अखेर जेसीबीच्या सहाय्याने या बसमधील प्रवाशांची सुटका करण्यात आली.