बंगळुरू : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-३ मोहिमेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मंगळवारी यशस्वीपणे पार पडला असून, यान पृथ्वीपासून उच्चतम कक्षेत दाखल झाले आहे. तेथे पुढील सहा दिवस फिरत राहून १ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ प्रत्यक्ष चंद्राच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करेल.
श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी प्रक्षेपण झाल्यानंतर चांद्रयान-३चा प्रवास आजवर अपेक्षेप्रमाणे सुरू आहे. चंद्राच्या दिशेने प्रत्यक्ष प्रवास सुरू करण्यापूर्वी यानाला पृथ्वीभोवताली अधिकाधिक उंचीवरील कक्षेत पाठवण्यात येत आहे. त्यासाठीचे पाचवे आणि अंतिम ऑर्बिट-रेझिंग मनुव्हर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांनी मंगळवारी यशस्वीपणे पार पाडले. त्यानंतर चांद्रयान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून महत्तम १,२७,६०९ किलोमीटर लांब आणि लघुत्तम २३६ किमी इतक्या अंतरावरील लंबगोलाकार कक्षेत पोहोचले आहे. तत्पूर्वी यान सर्वाधिक ७१,३५१ आणि कमीत कमी २३३ किमी अशा कक्षेत फिरत होते.
आजवर पृथ्वीभोवती अधिकाधिक उंचीच्या कक्षेत फिरताना यानाला जास्तीत जास्त गती देण्यात येत आहे. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी यानावरील लहान रॉकेट्स पुन्हा प्रज्ज्वलित करून त्याला एखाद्या लगोरीतून सोडलेल्या दगडाप्रमाणे चंद्राचे दिशेने मार्गस्थ केले जाईल. त्याला ट्रान्सलुनार इंजेक्शन असे संबोधले जाते. ही प्रक्रिया १ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान केली जाईल. तेव्हापासून चांद्रयानाचा चंद्राच्या रोखाने प्रवास सुरू होईल.
चंद्राजवळ पोहोचल्यानंतर यानाला चंद्राभोवती साधारण १०० किमी अंतरावरील कक्षेत फिरत ठेवण्यात येईल. त्यानंतर यान २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.