पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांनी भारतात सामील व्हावे! राजनाथ सिंह यांचे आवाहन

पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आम्ही आपले मानतो. त्यामुळे या नागरिकांनी भारतात सामील व्हावे, असे आवाहन संरक्षण मंत्री यांनी केले.
पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांनी भारतात सामील व्हावे! राजनाथ सिंह यांचे आवाहन
@rajnathsingh/ x
Published on

जम्मू : पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आम्ही आपले मानतो. त्यामुळे या नागरिकांनी भारतात सामील व्हावे, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारासभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, पाकव्याप्त काश्मिरातील लोकांना पाकिस्तान हा परदेशी मानतो, पण भारत तुम्हाला आपले मानतो. पाकिस्तानच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात पाकव्याप्त काश्मीर हा परदेशी भूभाग असल्याचे सांगितले. आम्ही जम्मू व काश्मीरचा इतका विकास करू की, पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक म्हणतील, आम्हाला पाकिस्तानात राहायचे नाही तर भारतात जायचे आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना मी सांगू इच्छितो की, पाकिस्तान तुम्हाला परदेशी मानत आहे. पण भारतीय तुम्हाला आपले मानतात. त्यामुळे जम्मू-काश्मीरच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला आमच्यात सामील व्हायचे असल्यास तुम्ही येऊ शकता, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच कोणत्याही भीती किंवा पक्षपाताशिवाय निवडणूक होत आहे. जम्मू-काश्मीरचे लोक मेहनती आणि गुणवान आहेत. पुढील १० वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे सरकार राहिल्यास हे राज्य देशातील सर्वात समृद्ध स्थान असेल.

दहशतवाद थांबवल्यास पाकशी चर्चेस तयार - राजनाथ

जम्मू-काश्मिरात पाकिस्तानने दहशतवाद रोखल्यास आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद केले पाहिजे. शेजाऱ्याशी संबंध सुधारणे कोणाला आवडणार नाही? कारण मला हे वास्तव माहीत आहे की तुम्ही मित्र बदलू शकता, पण शेजारी नाही. आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत, पण सर्वात आधी त्यांनी दहशतवाद थांबवावा, असे आवाहन त्यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in