तरुणांतील हार्ट अटॅकचा कोरोनाशी संबंध ; आयसीएमआरच्या अभ्यास गटाचा प्राथमिक निष्कर्ष
कोरोनाच्या विशेषत: दुसऱ्या लाटेनंतर अगदी तिशीतील, पस्तीशीतील तरुणांचा हसता खेळता हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक किंवा तत्सम कारणांनी मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणे आपल्या आजुबाजूला घडलेली आपण पाहिली आहेत. अगदी धडधाकट खेळाडू, नृत्य कलाकारही अशा अनाकलनीय पद्धतीने मृत्युमुखी पडल्याची अनेक उदाहरणे गेल्या दोन वर्षांत घडली आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रही चक्रावून गेले आहे. मात्र, याच्या कारणांच्या मुळाशी आता भारतीय वैद्यकीय संशोधक पोहोचत आहेत. आयसीएमआर अर्थात इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या अभ्यासातून या मृत्यूंचा संबंध कोरोनाशी असल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढले आहेत. कोरोनाची दीर्घकाळ लागण किंवा कोरोनावरील लसीमुळे हे मृत्यू झाल्याची जास्त शक्यता आयसीएमआरच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. या संशोधनाचा अंतिम अहवाल येत्या दोन आठवड्यांत सामान्यांसाठी खुला केला जाईल.
यावर्षीच्या मार्चमध्ये आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोनानंतर हृदयविकाराने होत असलेल्या अचानक मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा अभ्यास करण्यात आला आहे. आयसीएमआरचे सरसंचालक राजीव बहल यांनी सांगितले की, आमच्या तज्ज्ञांनी ६ महिन्यांत १०० हून अधिक मृतदेहांची सखोल तपासणी केली. या मृत्यूंचा कोरोनाशी संबंध आहे का, हे तपासण्यासाठी त्यांचा चार वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला.
आतापर्यंत कोरोनाची लस संशयाचा केंद्रबिंदू होती. पण, दिलासादायक बाब म्हणजे आयसीएमआरच्या अभ्यास गटाला हृदयविकाराचा अचानक झटका येण्यामागे लस हे कारण दिसले नाही. दुसरी सर्वात मोठी शंका कोरोनाच्या दुष्परिणामांची होती. ती अंशतः खरी असल्याचे आढळून आले आहे. लॉकडाऊननंतर जीवनशैलीत अनेक बदल झाले. त्यापैकी एक दीर्घकाळ बैठी नोकरी हा आहे. ज्या लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका आला, त्यांनी बरेच दिवस शारीरिक श्रम किंवा व्यायाम केलेला नसल्याचे दिसून आले. १०० हून अधिक प्रकरणांमध्ये केस हिस्ट्रीचीही तपासणी करण्यात आली. मृतदेहांच्या सीटी स्कॅनच्या मदतीने पॅटर्नचे मॅपिंग झाले. दीर्घकाळ कोरोना संसर्ग झालेल्यांच्या फुप्फुसांवर या महामारीचा गंभीर परिणाम झाल्याचे मात्र दिसून आले आहे.
असा केला अभ्यास
पहिला अभ्यास तरुणांच्या अचानक मृत्यूंच्या कारणांचा करण्यात आला. दुसरा अभ्यास अचानक हृदयविकाराने मृत्यू झालेल्या रुग्णांचा करण्यात आला. हा अभ्यास करताना कोरोनाची लस घेतली आहे का, दीर्घकाळ कोरोनाने रुग्ण आजारी होता का आणि रुग्ण किती आजारी होता, याचा विचार करण्यात आला. त्यासाठी आयसीएमआरने कोरोनाची लागण झालेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या वर्षभरातील वैद्यकीय अहवालांचा अभ्यास केला. त्यासाठी ४० वेगवेगळ्या रुग्णालयांकडून रुग्णांचे अहवाल तपासण्यात आले. तिसरा अभ्यास हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकमुळे अचानक मृत्यू झालेल्या रुग्णांचा करण्यात आला. हार्ट अटॅक आला, पण मृत्यू झाला नाही अशा रुग्णांचे अहवाल चौथ्या अभ्यासात तपासण्यात आले.