हैदराबाद : देशात समान नागरी कायद्याची आवश्यकता नसल्याचे सांगत भारतीय जनता पक्ष मात्र त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देत आहे, त्यावर टीका करीत एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुद्दीन ओवैसी यांनी आणखी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आवश्यता असल्याचे सांगितले. लोकांना धर्म आणि पोशाख यावरून लक्ष्य केले जाऊ नये यासाठी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे, असे त्यांनी सांगितले.
तेलंगणातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावर त्यांनी निशाणा साधला. देशातील विकासाबद्दलच्या महत्त्वाच्या समस्या सोडून, मूलभूत बाबी सोडून भाजप समान नागरी कायदा, हैदराबादमुक्ती दिन म्हणून १७ सप्टेंबर अधिकृत दिवस करणे, राम मंदिर आणि काशीसाठी ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य यात्रा अशा प्रकारची आश्वासने देत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचा हा जाहीरनामा नुकताच सादर केला होता. त्यावर टीका करताना ओवैसी म्हणाले की, माझी इच्छा आणि आशा आहे की अमित शहा यांनी आदिलाबाद, खम्मम आणि वारंगल येथे जाऊन सर्व आदिवासींच्या मध्ये उभे राहून त्यांना समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल सांगावे, मात्र त्यांच्यात ‘बौद्धिक हिंमत’ नाही. ते तसे करणार नाहीत, कारण तसे केले तर आदिवासी भाजपला नाकारतील.
आदिवासींना त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी घटनात्मक संरक्षण आहे, त्यासाठी यूसीसी आवश्यक नाही. या देशात काय आवश्यक आहे तर ते अधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कारण ज्यामध्ये लोक परिधान करीत असलेल्या कपड्यांवरून किंवा ते ज्या धर्माचे आहेत त्यावरून त्यांना लक्ष्य केले जाणार नाही, असेही ओवैसी म्हणाले.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे राजकारण द्वेषावर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला. तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष (ए. रेवंत रेड्डी) हे आरएसएसचे आहेत आणि आज मोहन भागवत यांच्याकडे काँग्रेसचा रिमोट कंट्रोल आहे, असेही ओवैसी यांनी सांगितले.