
इंदौर : दलित, मागासवर्गीय आणि मुसलमानांना समान हक्क देण्यापेक्षा ब्रिटिशांच्या राजवटीत राहणे पत्करेन, असे वाक्य माजी संघप्रमुख गोळवलकर गुरुजी यांच्या मुखी घालून समाजमाध्यमांवर संघाची बदनामी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावर इंदौर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिग्विजय सिंह यांनी संघाचे माजी प्रमुख गोळवलकर गुरुजी यांच्याबाबत वादग्रस्त विधान समाजमाध्यमावर पोस्ट केल्यानंतर स्थानिक वकील आणि संघाचे कार्यकर्ते राजेश जोशी यांनी शनिवारी रात्री आयपीसी कलम १५३-ए, ४६९, ५००, ५०५ या कलमांतर्गत तुकोगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत जोशी यांनी दलित, मागासवर्गीय, मुस्लीम आणि हिंदू यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे संघ आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही म्हटले आहे.