
चंदिगड : हरियाणातील नूह जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी झालेल्या दंगलीतील मृतांचा आकडा ६ वर पोहोचला आहे. त्यात दोन पोलीस आणि ४ नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी बुधवारपर्यंत ११६ जणांना अटक केली असून ९० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवली असून खुले पेट्रोल किंवा डिझेल विकण्यावर बंदी घातली आहे. या परिसरात केंद्रीय पोलीस दलांच्या आणखी चार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. परिसरात दोन दिवस संचारबंदी लागू आहे. समाजात सलोखा व शांतता राखण्यासाठी चिथावणीखोर वक्तव्ये केली जाऊ नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
हरियाणातील नूह जिल्ह्यात सोमवारी बजरंग दल आणि दुर्गा विहिनी यांनी बृज मंडल जलाभिषेक यात्रा आयोजित केली होती. त्या दरम्यान दोन गटांत दंगल झाली होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत दुकानांचे नुकसान केले होते. तसेच अनेक वाहने पेटवून दिली होती. दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला होता. दंगलीमधील मृतांचा आकडा बुधवारी ६ वर पोहोचला. नूह, पलवल, फरीदाबाद, गुरुग्राम येथे मंगळवारपर्यंत स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय पोलीस दलाच्या २० कंपन्या तैनात केल्या होत्या. बुधवारी त्यात आणखी चार कंपन्यांची भर पडली. त्याशिवाय इंडियन रिझर्व्ह बटालियनही तैनात केली जाणार आहे.
दरम्यान, दंगलीचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने बुधवारी दिल्ली आणि नोयडाच्या अनेक भागांत निदर्शने केली. निदर्शकांनी हाती भगवे झेंडे घेऊन जय श्रीराम, हर हर महादेव, वंदे मातरम अशा घोषणा देत भदरपूर बॉर्डर भागात वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. नोयडाच्या सेक्टर २७ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जबलपूर, बिकानेर, कानपूर आदी शहरांतही अशाच प्रकारची निदर्शने झाली.
मुख्यमंत्र्यांचे भरपाईचे आश्वासन …
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दंगलीच नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्याचे, तसेच दंगलखोरांना पकडून शिक्षा देण्याचे वचन दिले आहे. दंग्यात ज्यांच्या मालमत्तेचे ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे, त्यांना ८० टक्के भरपाई सरकार देईल. ज्याचे नुकसान ५ ते १० लाख रुपयांदरम्यान आहे त्यांना सरकार ७० टक्के भरपाई देईल. तर १० ते २० लाखांदरम्यान नुकसान असलेल्या नागरिकांना सरकार ६० टक्के भरपाई देईल, असे खट्टर यांनी सांगितले.