पंतप्रधानांच्या हस्ते नाण्यांच्या मालिकेचे लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते नाण्यांच्या मालिकेचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या ६ ते ११ जूनदरम्यान साजऱ्या होणाऱ्या आयकॉनिक वीक सोहळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी पीएम मोदींनी कॉर्पोरेट मंत्रालयाच्या योगदानावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमादरम्यान भारतीय रुपयाचा गौरवशाली प्रवासही दाखविला. यासोबतच स्वातंत्र्याच्या अमृत- महोत्सवाला वाहिलेल्या नवीन नाण्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये १ ते २० रुपयांपर्यंतच्या नाण्यांची विशेष मालिकाही जारी केली.

ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने आपल्या कृतीतून, योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन वारसा निर्माण केला आहे. खूप मोठा प्रवास घडवला आहे. ते म्हणाले की, तुम्ही सर्वजण या वारशाचा एक भाग आहात. देशातील सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणे असो किंवा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे असो, गेल्या ७५ वर्षांत अनेक सहकाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुधारणांवर आम्ही लक्ष केंद्रित केले. जीएसटीने आता केंद्र आणि राज्यांमध्ये अनेक करांच्या जाळ्याची जागा घेतली आहे. त्याचा परिणामही देश पाहत आहे. आता जीएसटी संकलन दरमहा एक लाख कोटी रुपयांच्या पुढे जाणे सामान्य झाले आहे. गेल्या आठ वर्षांत देशाने केलेल्या सुधारणांमध्ये आपल्या देशातील तरुणांना त्यांची क्षमता दाखविण्यासही मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. आमचे तरुण त्यांना हवी असलेली कंपनी सहज उघडू शकतात, ते त्यांचे उद्योग सुरु करू शकतात आणि सहज चालवू शकतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in