नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते १२ सप्टेंबर रोजी देशाच्या सीमाभागातील ९० पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्या सैन्यावर वचक ठेवण्यास सेनादलांना मदत मिळणार आहे.
हे सर्व प्रकल्प सेनादलांच्या बॉर्डर रोड्स ऑर्गनायजेशन (बीआरओ) या संघटनेने बांधून पूर्ण केले आहेत. त्यात जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमधील २१ नवीन रस्ते, ६४ पूल, एक बोगदा, दोन विमानतळ आणि दोन हेलिपॅड्सचा समावेश आहे. त्यातील जम्मू-काश्मीरमधील बिश्नाह-कौलपूर-फुलपूर रस्त्यावरील देवक येथील पूल विशेष उल्लेखनीय आहे. या प्रकल्पांच्या पूर्ततेमुळे सेनादलांना पाकिस्तान आणि चीन सीमेवर सैनिक आणि युद्धसामग्रीची वाहतूक करणे सोयीचे होणार आहे.
यापूर्वी संरक्षण मंत्र्यांनी जानेवारी २०२३ मध्ये अरुणाचल प्रदेशमधील सियोम पुलाचे आणि अन्य २७ प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. हे प्रकल्पदेखील बीआरओने बांधून पूर्ण केले होते आणि त्यांचा एकूण खर्च ७२४ कोटी रुपये होता. आलॉंग-यिंगकिआंग मार्गावरील सियोम पुलामुळे भारतीय लष्कराला अरुणाचल प्रदेशचा अप्पर सियांग जिल्हा, तसेच तुतिंग आणि यिंगकआंग भागात सैन्य आणि युद्धसामग्री पोहोचवण्यास मदत होत आहे.