
मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह इतर काही ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली. आता या प्रकरणात लवकरच ‘ईडी’ची एन्ट्री होण्याचीही शक्यता आहे. सिसोदिया यांच्यावर ज्या तीन कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यातील दोन कलमे ही ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनीलाँड्रिंग’ ॲक्टच्या अंतर्गत आहेत. ‘ईडी’च्या एका माजी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार लवकरच या प्रकरणात ‘ईडी’चा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
मनीष सिसोदिया यांच्याविरोधात आयपीसीची १२० ब, ४७७ अ आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन’च्या अंतर्गत कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील कलम १२० ब आणि ‘प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन सात’ या कलमांन्वये ‘ईडी’ या चौकशीत सहभागी होऊ शकते. ही दोन्ही कलमे मनीलाँड्रिंगच्या संबंधात आहेत. अशा प्रकरणात ‘ईडी’ तातडीने कारवाई करते.