
"दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचा पराभव झाल्याची बातमी ऐकून माझ्या पत्नीला रडू कोसळले. कारण त्यांनीच यापूर्वी माझ्या पत्नीला म्हटले होते अजून 'ताकद' आहे. त्याला माझ्या पत्नीने उत्तर देत म्हटले होते की 'ताकद' सदैव तर राहत नाही, असो अशाप्रकारे गर्व, अहंकार इतर लोकं, अन्य पक्ष करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो", असे म्हणत कवी कुमार विश्वास यांनी मनिष सिसोदिया यांच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. तसेच, 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता विश्वास यांनी जोरदार हल्लाबोल केला. 'चारित्र्यहीन, स्वार्थी, निर्लज्ज व्यक्ती, असा उल्लेख करत आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण काढत त्यांनी केजरीवालांवर विखारी टीका केली. दरम्यान, त्यांनी भाजपचे विजयाबद्दल अभिनंदन देखील केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू असून निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. २७ वर्षांनंतर भाजपची सत्ता राजघधानी दिल्लीमध्ये परतणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याचे चित्र आहे. निकालांमध्ये आपला मोठा झटका मिळाला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागलाय. कवी कुमार विश्वास यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
केजरीवालांवर नाव न घेता टीका
विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन करत विश्वास यांनी ते दिल्लीच्या लोकांसाठी चांगले काम करतील अशी आशा व्यक्त केली. तसेच, निकालाचं दुःख किंवा आनंद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी नाव न घेता केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. "मला अशा माणसाबद्दल सहानुभूती नाही ज्याने आप पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्वप्ने भंग केली. दिल्ली आता त्यांच्यापासून मुक्त झाली आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा वापर स्वतःच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी करणाऱ्या व्यक्तीला आज शिक्षा झाली. आज न्याय मिळाला. असे ते म्हणाले. पुढे त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांनाही सल्ला दिला. 'सर्व काही माहित असतानाही काही लालसेपोटी मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या, गुरूला धोका देणाऱ्या, खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या महिलांना मारहाण करणाऱ्या आणि लोकांच्या कष्टाचा पैसा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणे बंद करा, यातून बाहेर पडा आणि स्वतःचं जीवन जगा' असेही ते म्हणाले.
''माझी पत्नी सहसा राजकारणाविषयी बोलत नाही. मात्र, आज जेव्हा मनिष सिसोदिया यांच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यावेळी तिला रडू आवरले नाही. कारण सिसोदिया यांनी माझ्या पत्नीला अजून 'ताकद' बाकी आहे असे म्हटले होते. त्यावेळी माझ्या पत्नीने त्यांना उत्तरादाखल दादा 'ताकद' सदैव तर राहत नाही ना, असे म्हटले होते. असो अशाप्रकारे गर्व, अहंकार इतर लोकं, अन्य पक्ष करणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करतो", असेही त्यांनी अखेरीस म्हटले.