
आयकर विभागाने गुरुवारी मोठी कारवाई केली. इन्कम टॅक्सच्या पथकाने गुजरातमध्ये ३५ ते ४० ठिकाणी छापे टाकले असून, ते अजूनही सुरूच आहेत. सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात म्हटले आहे की, एशियन ग्रॅनिटो इंडियाच्या आवारात विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आणि कंपनीच्या आवारात वेगवेगळी पथके शोध मोहीम राबवत आहेत.
विशेष म्हणजे, देशातील सर्वात मोठ्या लक्झरी बाथवेअर सोल्यूशन्स ब्रँडने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये उत्कृष्ट आर्थिक कामगिरीचा अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर एका दिवसानंतर कंपनीच्या परिसरावर हे छापे पडले. कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर करताना, कंपनीने बुधवारीच आणखी तीन राज्यांमध्ये आपला व्यवसाय वाढवण्याची योजना उघड केली होती.
कंपनीने गुजरातमधील मोरबी येथे भारतातील सर्वात मोठ्या प्रात्यक्षिक केंद्रांपैकी एक स्थापन करण्याची योजना आखली आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. याअंतर्गत कंपनीने जमीनही संपादित केली आहे. यावर लवकरच काम सुरू राहण्याची अपेक्षा आहे. एशियन ग्रॅनिटोला आपले या क्षेत्रातील आघाडीचे स्थान अधिक मजबूत करण्याची आशा आहे. मात्र, आयकर विभागाच्या छाप्यानंतर कंपनीचा समभाग सहा टक्क्यांनी घसरला आहे.