राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी पवारांच्या नावाची चर्चा

पवारांच्या नावावर एकमत होण्याचा विरोधकांना विश्वास वाटत आहे
 राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी पवारांच्या नावाची चर्चा

देशात येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी विरोधकांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर प्रामुख्याने चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. पवारांच्या नावावर एकमत होण्याचा विरोधकांना विश्वास वाटत आहे. याबाबत मतैक्य झाले, तर शरद पवार विरोधकांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची त्यांच्या नावाला पसंती असल्याचे संकेत दिले. खरगेंनी याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्याशीही चर्चा केली आहे. विशेष म्हणजे, रविवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही पवारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे.

शरद पवार यांचे अनेक आघाड्या व आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला एकत्र आणून भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेतून बेदखल करण्यातही त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केले; पवारांच्या चाणक्यनीतीमुळे ते अवघ्या तीन दिवसांतच कोसळले.दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे हेमंत सोरेन व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी २२ नेत्यांना पत्र लिहून १५ जूनला बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शरद पवारांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे समजते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in