द्रौपदी मुर्मू यांनी सेंट्रल हॉलमध्ये घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

राष्ट्रपती भवनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली
द्रौपदी मुर्मू यांनी सेंट्रल हॉलमध्ये घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये १०.१५ वाजता शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. ​​​​राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, “देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. अशा वेळी देशाच्या राष्ट्रपती बनणे हे माझे सौभाग्य आहे. याबद्दल जनतेचे मी आभार मानते. यापुढे मी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करणार आहे.”

तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतली. राष्ट्रपती भवनाकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणात म्हणाल्या की “मी माझी जीवनयात्रा ओडिशातील भूमीतून सुरू केली. आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाची राष्ट्रपती झाली.” राष्ट्रपती म्हणाल्या, “मी, जिथून आले त्या समुदायात, भागात अगदी प्राथमिक शिक्षण हेही स्वप्नवत आहे. गरीब, मागासलेल्याचे प्रतिबिंब माझ्यात दिसते. मी भारतातील तरुण आणि महिलांना खात्री देते की, या पदावर काम करताना मी त्यांच्या हितासाठी तत्पर असेन. संसदेत माझी उपस्थिती भारतीयांच्या आशा आणि हक्कांचे प्रतीक आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तुमचा विश्वास आणि पाठिंबा मला नवीन जबाबदारी घेण्याचे बळ देत आहे.”

देशहितासाठी कार्य करू

“नव्या रस्त्यावर चालणाऱ्या भारतासाठी मी प्रगतीचा संकल्प करीत आहे. मी समस्त देशवासीयांना विश्वास देते की, या पदावर काम करताना मला देशहित महत्त्वाचे असेल,” असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. “देशाच्या महान स्वातंत्र्यसेनानींनी राष्ट्रीय स्वाभिमान शिकवला. राणी लक्ष्मीबाई, राणी चेनम्मासारख्या महिलांनी नारीशक्तीची भूमिका दाखवून दिली. संथाल क्रांतीने आदिवासींच्या उत्थानासाठी प्रयत्न केले. बिरसा मुंडा यांच्याकडून प्रेरणा मिळाली,” असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.

भारताने नवे मापदंड प्रस्थापित केले

“आम्ही भारतीयांनी आपल्या प्रयत्नांनी जगासमोर नवे मापदंड प्रस्थापित केले. कोरोना व्हॅक्सिनचा जागतिक विक्रम आपण केला. कोरोना महामारीत जग झुंजतेय; पण भारताकडे एका विश्वासाने जग पाहत आहे. आगामी महिन्यात आपला देश ‘जी-२०’ ग्रुपच्या यजमानपदी असेल. भारतात होणाऱ्या या परिषदेचा येत्या काळात देशाला फायदा होईल,” असे त्यांनी सांगितले.

भारताला आत्मनिर्भर बनवू

“आदिवासी समाजात माझा जन्म झाला. या समाजाने निसर्गासोबत आपला अधिवास ठेवला. मी जंगल आणि नद्यांच्या सानिध्यात होते. पूर्ण निष्ठेने काम करण्यासाठी मी तत्पर असून आपण सर्वांनी समर्पित होऊन भारताला आत्मनिर्भर बनवू, वैभवशाली करू,” असे आवाहन मुर्मू यांनी केले.

शपथविधीला ओडिशातील ६४ विशेष पाहुणे

मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमाला ओडिशातील ६४ विशेष पाहुणे उपस्थित होते. शपथविधीनंतर राष्ट्रपती भवनात विशेष पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सर्वांना संपूर्ण इमारत फिरून दाखवण्यात आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in