हिसार : हरयाणाचे बहुचर्चित आमदार गोपाल कांडा यांच्या घरी आणि कार्यालयांवर बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ईडीने छापे टाकले. कांडा यांचे गुरुग्राममधील घर आणि त्यांच्या एमडीआरएल या एअरलाइन्स कंपनीच्या कार्यालयांवर छापे टाकून ईडीने महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत.
हरयाणा लोकहित पार्टीचे प्रमुख आणि सिरसा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या गोपाल कांडा यांनी भाजप आणि जजपा सरकार स्थापन करताना बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यांचे भाऊ गोविंद कांडा हे भाजपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच एअरहोस्टेसच्या आत्महत्या प्रकरणातून गोपाल कांडा यांना क्लिन चीट मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा केली होती. हरयाणा सरकारमध्ये मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या गोपाल कांडा यांना मात्र ईडीने छापेमारी केल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
हरयाणाचे माजी गृहराज्यमंत्री आणि विद्यमान आमदार गोपाल कांडा यांच्याकडे २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, ७० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. सिरसामध्ये त्यांनी अडीच एकर जागेवार महल बांधला आहे.