नवी दिल्ली : 'चॅटजीपीटी' या लोकप्रिय चॅटबॉटची निर्मिती करणारे सॅम आल्टमान यांची 'ओपनएआय' या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी मीरा मुरती यांची हंगामी नेमणूक केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असून त्याने जगभरच्या तंत्रज्ञान क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. या घडामोडींमुळे कंपनीचे अध्यक्ष आणि सहसंस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांनी राजीनामा दिला आहे.
ओपनएआय या कंपनीने काही महिन्यांपूर्वी चॅटजीपीटी या चॅटबॉटची निर्मिती करून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय) क्षेत्रात खळबळ उडवली होती. त्यांच्या या चॅटबॉटला अल्पावधीत आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला होता. या अॅप्लिकेशनचा वापर करून निबंध, पत्रे, कविता, बातम्या आदी मजकूर सहजपणे लिहिता येऊ लागला. तसेच त्याच्या मदतीने संगणकाचे प्रोग्रॅमही लिहिले जाऊ लागले. लवकरच चॅटजीपीटीमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ लागतील, अशी भीतीही व्यक्त केली जाऊ लागली. या सर्व घटनांमुळे कंपनी बरीच प्रसिद्धीच्या झोतात आली.
खरे कारण गुलदस्त्यात
या कंपनीच्या संचालक मंडळाने अचानक सॅम आल्टमान यांना सीईओ पदावरून काढून टाकले आहे. गेल्या काही दिवसांत आल्टमान संचालक मंडळाबरोबर पुरेसा सातत्याने संवाद साधत नव्हते आणि कंपनीला वाढीच्या पुढील टप्प्यात नव्या नेतृत्वाची गरज आहे, असे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. मात्र, त्या पलीकडे काही कारण आहे का, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. ओपनओआयच्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर मीरा मुरती यांची आता हंगामी सीईओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.