नांदयाळ : कौशल्य विकास घोटाळाप्रकरणी आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी भल्या सकाळी अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केले होते. हा घोटाळा २५० कोटींहून अधिक रुपयांचा आहे.
नंदयाळ शहरात एका सभेला संबोधित करण्यापूर्वी ते एका बसमध्ये आराम करत होते, तेव्हा त्यांना अटक झाली. सीआयडीचे अधिकारी, नंदयाळ जिल्हा पोलीस, कुर्नुल विभागाचे पोलीस महानिरीक्षक रघुरामी रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथक नायडू असलेल्या भागात पहाटे तीन वाजता पोहोचले. तेथे नायडू यांना अटक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तेव्हा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. पोलीस व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अटकेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना नंदयाळ रुग्णालयात नेले जाणार होते. मात्र, त्यांनी तेथे जाण्यास नकार दिल्यानंतर त्यांची तपासणी कॅम्प साइट भागात करण्यात आली. तेथून त्यांना विजयवाडा येथे नेण्यात आले. तेथे त्यांना न्यायालयात उभे केले जाईल. दरम्यान, आंध्र पोलिसांनी चंद्राबाबू यांचा मुलगा नारा लोकेश यांना ईस्ट गोदावरी जिल्ह्यात ताब्यात घेतले. लोकेश हे पदयात्रा करत होते. तेव्हा त्यांना विजयवाडा येथे जाऊ दिले नाही.
९ डिसेंबर २०२१ मध्ये कौशल्य विकास घोटाळाप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्यात २५ जणांना आरोपी केले. त्यात नायडू यांचे नाव नव्हते. यंदा सीआयडीने कौशल्य विकास घोटाळ्याचा तपास सुरू केला. त्यात ज्या बाबी उघड झाल्या. त्यावरून चंद्राबाबू यांना अटक झाली.