‘फ्रॉड-जीपीटी’ बँक खाती रिकामी करणार

सायबर गुन्हेगारांचा नवा कारनामा; डार्कवेबवर मासिक शुल्कावर उपलब्ध
‘फ्रॉड-जीपीटी’ बँक खाती रिकामी करणार
Published on

नवी दिल्ली : जगात ‘चॅट-जीपीटी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला सुरू आहे. विषय कोणताही असो, तुम्हाला हवी असलेली माहिती हे टूल तात्काळ देतो. त्यामुळे कोट्यवधी लोक त्याच्या प्रेमात पडले आहेत. आता याच चॅटजीपीटीचा वापर करून गुन्हेगारांनी ‘फ्रॉडजीपीटी’ तयार केले आहे. यामुळे तुमचे बँक अकाऊंट एका झटक्यात रिकामी होण्याचा धोका वाढला आहे.

वाढत्या तंत्रज्ञानामुळे काम सोपे होत आहे. मात्र, आव्हानेही वाढली आहेत. सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना टिपण्यासाठी विविध तंत्राचा वापर करतात. आता त्यांनी ‘चॅट जीपीटी-३’ तंत्रज्ञानावर आधारित ‘फ्रॉड जीपीटी’ व ‘वॉर्मजीपीटी’ तयार करून ते चॅटबॉट विकायला काढले आहेत. डार्कबेवर याची विक्री सुरू आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला कोणतेही नियम, कायदे, सीमा लागू होत नाही. त्यामुळे ही सायबर हत्यारे गुन्हेगारांना अधिक शक्तीशाली बनवत आहेत.

भले भले फसू शकतात

‘फ्रॉड जीपीटी’ व ‘वॉर्मजीपीटी’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट सायबर गुन्हेगारांसाठी व्हायरस पसरवण्याचे काम करू शकतात. याच्या मदतीने सायबर गुन्हेगार फिशींग ईमेल किंवा मेसेज तयार करू शकतात. त्यांची ओळख पटवण्यात भले भले लोक फसू शकतात. तुम्ही एकदा फसल्यास तुमची सर्व कमाई जाऊ शकते.

डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध

‘फ्रॉड जीपीटी’ व ‘वॉर्मजीपीटी’ हे चॅटबॉट २०० ते १७०० डॉलर्स दरमहा शुल्कावर उपलब्ध आहेत. याचाच अर्थ कोणीही सायबर गुन्हेगार दरमहा दीड ते ३५ हजार रुपये खर्च करून ‘फ्रॉड जीपीटी’ व ‘वॉर्मजीपीटी’ या चॅटबॉटचा वापर गुन्हेगारी कामासाठी करू शकतो. डार्क वेबची दुनिया गुंतागुंतीची असून त्याचा थांगपत्ता लावणे कठीण आहे.

तर काय कराल?

या नवनवीन सायबर फसवणुकीतून स्वत:ची सुटका करून घ्यायची असल्यास सर्वसामान्य माणसाने लोभाचा त्याग केला पाहिजे. तसेच बँकिंग व वित्तीय कामासाठी दोन मोबाईलचा वापर करावा. मनात फसवणुकीचा जराजरी संशय आल्यास तात्काळ १९३० क्रमांकावर संपर्क साधून तेथे तक्रार करावी. डिजीटल गुन्हे रोखण्यासाठी सरकारने ही हेल्पलाईन बनवली आहे. तेथे तुम्ही तक्रारही करू शकता.

logo
marathi.freepressjournal.in