आदित्य एल-१ यानाच्या कक्षेत आणखी विस्तार - १९ सप्टेंबरला सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू

यानाचा लाग्रान्ज-१ बिंदूच्या दिशेने ११० दिवसांचा प्रवास सुरू होईल
आदित्य एल-१ यानाच्या कक्षेत आणखी विस्तार
- १९ सप्टेंबरला सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी आदित्य एल-१ यानाच्या कक्षेत चौथ्या वेळी विस्तार केला. आता यान पृथ्वीपासून कमीत कमी २५६ किमी आणि अधिकतम १ लाख २१ हजार ९७३ किमी अंतरावरील कक्षेत पोहोचले आहे.

इस्रोच्या टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क केंद्राने शुक्रवारी पहाटे २ वाजून १५ मिनिटांनी आदित्य एल-१ यानाच्या कक्षेचा विस्तार केला. बंगळुरू, श्रीहरिकोटा, पोर्ट ब्लेअर, मॉरिशस आणि फिजी येथील केंद्रांवरून यानाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. आदित्य एल-१ यानाचे २ सप्टेंबर रोजी प्रक्षेपण झाले होते. त्यानंतर १६ दिवस यान पृथ्वीपासून अधिकाधिक अंतरावरील कक्षेत नेण्यासाठी पाच ऑर्बिट-रेझिंग मनुव्हर्स पार पाडण्यात येणार होती.

त्यानंतर यानाचा प्रत्यक्ष सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावरील लाग्रान्ग-१ बिंदूजवळ जाऊन यान सूर्याची निरीक्षणे करणार आहे. त्यासाठी १९ सप्टेंबर रोजी यानाला लाग्रान्ग बिंदूकडील प्रवासाला पाठवले जाईल. त्यासाठी ट्रान्स-लाग्रान्जियन-१ इन्सर्शन (टीएलआय) मनुव्हर करण्यात येईल. त्यानंतर यानाचा लाग्रान्ज-१ बिंदूच्या दिशेने ११० दिवसांचा प्रवास सुरू होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in