
दिल्लीमधील कांजवाला परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली. काही मद्यधुंद तरुणांनी एका तरुणीला ४ किलोमीटर गाडीने फरफटत नेले. या अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. ३१ जानेवारीच्या मध्यरात्री ही संतापजनक घटना घडली. या अपघातानंतर त्या मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी गाडीमधील पाच तरुणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु असून यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्वजण करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी तिच्या कुटुंबामध्ये एकमेव कमावती होती. तिच्या मागे दोन लहान भाऊ आणि बहिणी आहेत. तिच्या वडिलांचे निधन झाले असून तिची आई ही आजारी असते. या घटनेतील आरोपी तरुण हे मद्यधुंद अवस्थेत होते. ते दिल्लीतील मुरथल सोनीपत येथून मंगोलपुरी येथील त्यांच्या घरी जात होते. यावेळी सुलतानपुरीजवळ त्यांच्या गाडीने तरुणीच्या स्कूटीला धडक दिली. त्यामुळे मुलगी गाडीखाली अडकली आणि आरोपी मुलांनी तिला ७ ते ८ किलोमीटरपर्यंत ओढत नेले.