उत्तर गोव्यातील अर्पोरा येथे ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये शनिवारी (दि. ६) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. या क्लबचे फरार मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांच्या मुख्य शाखेवर बुलडोझर चालवण्याचे आदेश मंगळवारी (९ डिसेंबर) मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले होते. त्यानुसार कारवाई करत गोव्यातील शॅक पाडण्यात आला.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाला आवश्यक औपचारिकता पूर्ण करून शॅक पाडण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार, सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांचे वॅगेटॉर (Vagator) येथील 'रोमिओ लेन'चे मुख्य आऊटलेट जमीनदोस्त करण्यात आले.
ही रचना शासकीय जमिनीवर बेकायदेशीररीत्या उभारल्याचा आरोप असून, आगीच्या घटनेनंतर या कामाला वेग आल्याचे पाहायला मिळाले.
घटनेनंतर ३ तासांत देशाबाहेर
सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा बंधूंनी आगीच्या घटनेनंतर काही तासांतच देश सोडला. ते दोघे थायलंडला पळून गेले. घटनेच्या काही तासांनंतर ७ डिसेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने ते फुकेतला गेले. त्यानंतर इंटरपोलने सौरभ आणि गौरव लुथ्रा यांच्याविरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे
गुन्हे दाखल; गंभीर आरोप
गोवा पोलिसांनी लुथ्रा बंधूंवर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ‘Culpable homicide not amounting to murder’ म्हणजेच खून न करता मनुष्यवध आणि कटकारस्थान असे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. दोघांनीही पोलिसांशी कोणताही संपर्क साधला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.