शिवसेना आणि बंडखोर गटाच्या वादावर २० जुलैला सुनावणी, सर्व याचिका खंडपीठासमोर येणार

शिवसेनेतील बंडखोरीपासून राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावरही सुनावणी घेईल.
शिवसेना आणि बंडखोर गटाच्या वादावर २० जुलैला सुनावणी, सर्व याचिका खंडपीठासमोर येणार

शिवसेना आणि बंडखोर गटात सुरू असलेल्या वादावर दाखल झालेल्या सर्व याचिकांची सुनावणी २० जुलै रोजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे. सर्वोच्च न्यायालय यावर काय निरिक्षणे नोंदवते आणि काय निकाल देते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरीपासून राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावरही सुनावणी घेईल.

शिवसेनेतील वादावर सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्यानंतर विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ सदस्यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका बंडखोरांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण वादावर चार याचिका दाखल झाल्या आहेत. या चारही याचिकांवर २० जुलैला सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली याचिका, उपसभापतींनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका, उपसभापतींना कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी भरत गोगावलेसह १४ शिवसेना आमदारांनी दाखल केलेली याचिका, उपसभापतींच्या हकालपट्टीचा निर्णय होईपर्यंत अपात्रतेची याचिका या सर्व याचिकांवर सुनावणी होणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे बोलले जात होते. २० जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिले होते; मात्र शिवसेनेच्या फुटीर आमदारांच्या अपात्रतेसह सर्वच याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय घटनापीठापुढे २० जुलैला सुनावणी होणार असल्याने तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in