देशातील कारच्या मागणीत प्रचंड वाढ;कारनिर्मितीसाठी अहोरात्र काम सुरू

हरियाणातील मानेसर आणि गुरुग्राम येथील मारुतीच्या प्लांटमध्ये दिवसरात्र कारनिर्मिती केली जात आहे.
देशातील कारच्या मागणीत प्रचंड वाढ;कारनिर्मितीसाठी अहोरात्र काम सुरू

गणेशोत्सव संपल्यानंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते दसरा आणि दिवाळीचे. सणासुदीच्या दिवशी एखादे वाहन घेण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल असतो. श्रावण महिन्यापासून देशातील कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून, दिवाळीपर्यंत ही मागणी कित्येक पटींनी वाढू शकते. त्यामुळेच ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार उत्पादक कंपन्यांनी कंबर कसली असून कारनिर्मितीसाठी दिवसातून २४ तास अहोरात्र काम सुरू आहे.

सध्या मारुतीकडे ४.०८ लाख कारची वेटिंग असून हरियाणातील मानेसर आणि गुरुग्राम येथील मारुतीच्या प्लांटमध्ये दिवसरात्र कारनिर्मिती केली जात आहे. सणासुदीच्या काळातच ऑर्डर पूर्ण करण्याचे सध्या कंपनीचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे, वेगाने पुरवठा करण्यासाठी कंपनीने गेल्या महिन्यात नवीन लोकांची भरती केली असून सव्वा लाख लोकांना नवीन रोजगार मिळाला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून सेमीकंडक्टरचा तुटवडा सुरू झाला होता. सप्टेंबरमध्ये केवळ ४० टक्के निर्मिती होऊ शकली; मात्र या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत उत्पादन झाले. आता उत्पादनाची पातळी १०० टक्क्यावर येत आहे. यंदाच्या ऑगस्ट महिन्यातच एक लाख ६५ हजार १७३ गाड्यांची विक्री झाली असून, नोव्हेंबरमध्ये विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे, असे मारुती सुझुकीच्या मार्केटिंग अॅण्ड सेल्स विभागाचे एसईओ शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले.

ह्युंदाई देशातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून सणासुदीचा काळ पाहता त्यांनी आधीच तयारी पूर्ण केली आहे. कंपनीने सणासुदीच्या काळातील मागणी पाहता एक महिन्याचा अॅडव्हान्स स्टॉक तयार केला आहे. यामुळे वेटिंगची समस्या राहणार नाही.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in