नवी दिल्ली : उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना आपण लोकसभा वेबसाइटचा लॉगइन आयडी व पासवर्ड दिला होता, अशी कबुली खासदार महुआ मोईत्रा यांनी दिली.
एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, मी हिरानंदानी यांच्याकडून कोणतीही लाच घेतली नाही. मी हिरानंदानी यांना लॉगइन आयडी व पासवर्ड शेअर केला होता. कारण त्यांच्याकडून ते प्रश्न देऊ शकतील. मी जे प्रश्न लोकसभेच्या वेबसाइटवर टाकले होते, ते उद्योगपती हिरानंदानी यांच्या कार्यालयातील कोणत्या तरी कर्मचाऱ्याने टाइप केले होते.
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. मोईत्रा यांनी सांगितले की, हिरानंदानी समूहाचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांच्याकडून मला गिफ्ट म्हणून एक स्कार्फ व मेकअपचे सामान मिळाले होते. दर्शन हिरानंदानी माझ्या आयडीवरून लॉगइन करत होता. कारण मी माझ्या लोकसभा मतदारसंघात व्यस्त होते. प्रश्न विचारल्यानंतर माझ्या क्रमांकावर एक ओटीपी येत होता. तो ओटीपी दिल्यानंतरच प्रश्न विचारला जाऊ शकत होता, असे मोईत्रा म्हणाल्या.
भाजप नेते दुबे यांच्यावर टीका करताना मोईत्रा म्हणाल्या की, भाजपने झारखंडचा एक पिटबुल माझ्या पाठी सोडला आहे. त्यावर भाजप नेते दुबे म्हणाले की, मोईत्रा यांनी झारखंड व बिहारचा अपमान केला आहे. याप्रकरणी मी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे, असे ते म्हणाले.
संसदेच्या नैतिक समितीने मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत हजर राहून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. त्यानंतर मोईत्रा यांना दुसरी तारीख देण्यास सांगितले. आता लोकसभेच्या नैतिक समितीने त्यांना २ नोव्हेंबरची तारीख दिली आहे.