नवी दिल्ली : सचिन पायलट आणि मी उमेदवारीच्या सर्व निर्णयांमध्ये एकत्र निर्णय घेत आहोत. आमच्यात आता कोणतेही मतभेद नाहीत. पायलट यांच्या समर्थकांना उमदेवारी दिली जात आहे. मला मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे, हे मी आधीच स्पष्ट केले आहे, पण हे पद मला सोडत नाही आणि सोडणारही नाही. हायकमांड आणि गांधी परिवार माझ्यावर इतका विश्वास का दाखवत आहे, यामागे काहीतरी कारण असावे, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी पुन्हा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली आहे.
गेहलोत म्हणाले, ‘‘काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनू नये. कारण, जो उमेदवार होतो तो कधीच मुख्यमंत्री होत नाही. मी गेल्यावेळीही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हतो. आताही दावा सांगणार नाही.’’ उमेदवारांबाबत पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या प्रश्नावर गेहलोत म्हणाले, ‘‘सचिन पायलट आणि माझ्यात आता कोणतेच मतभेद नाहीत. आम्ही परस्पर संमतीने उमेदवार निश्चित करत आहोत, हीच विरोधकांसमोरील मोठी अडचण आहे.’’
भाजप वसुंधरा राजे यांना पाठिंबा देणाऱ्यांची तिकिटे रद्द करत असल्यावर गेहलोत म्हणाले, ‘‘माझ्यामुळे वसुंधरा यांना शिक्षा होऊ नये, हा त्यांच्यावर अन्याय होईल. २०२० मध्ये माझ्या सरकारवर संकट आले असताना कैलाश मेघवाल यांनी राजस्थानमध्ये अशाप्रकारे सरकार पाडण्याची परंपरा नाही, असे विधान केले होते. भैरोसिंह शेखावत मुख्यमंत्री असताना आणि ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते, तेव्हा त्यांच्या काही नेत्यांना सरकार पाडायचे होते. काही नेत्यांनी माझ्याकडे येऊन सरकार पाडण्यासाठी मदत मागितली. मी साफ नकार दिला. त्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव आणि राज्यपाल बळीराम भगत होते. सरकार पाडण्यासाठी सहकार्य करणे योग्य होणार नाही, असेही मी त्यांना सांगितले. मेघवाल यांना याची माहिती होती.’’