नवी दिल्ली : महादेव ॲॅपचा खरा मालक मीच आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सांगण्यावरून दुबईला गेलो, असा दावा या प्रकरणातील आरोपी शुभम सोनी याने केला.
दुबईतून एक व्हिडीओ जारी करून तो म्हणाला की, मीच महादेव बेटिंग ॲॅपचा मालक आहे. त्यासाठी त्याने पॅनकार्ड, आधार कार्ड व पासपोर्ट दाखवला. भिलाईमध्ये मी छोटी बुकिंग सुरू केली. तेव्हा बुकिंगमधून पैसा येऊ लागला. माझी लाईफस्टाइल बदलली. पुढे पुढे हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर कळले. माझ्या साथीदारांना अटक होऊ लागली. त्यानंतर मी वर्माजी यांच्या संपर्कात आलो. मी त्यांना १० लाख रुपये महिना संरक्षण म्हणून देऊ लागलो. माझे साथीदार पकडल्यावर मी वर्माजी यांना सांगितले. तेव्हा त्यांनी माझी बैठक मुख्यमंत्री बघेल यांच्यासोबत केली.
तेव्हा बिट्टू जी व मुख्यमंत्री साहेब म्हणाले की, तुमचे काम वाढवा व दुबईला जा. तेथे माझे चांगले काम सुरू होते. मात्र काही अडचणी निर्माण झाल्या. माझे साथीदार पकडले गेले. मी पुन्हा रायपूरला आलो. पुन्हा वर्माजी व गिरीश तिवारी आणि त्यावेळचे पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांना भेटलो. अग्रवाल यांनी माझे बोलणे मुख्यमंत्री बघेल यांच्यासोबत करून दिले. तेव्हा मुख्यमंत्री मला म्हणाले की, तुला काम सांभाळायला पाठवले होते. तू तर मालकच बनलास. मी विनंती केल्यानंतर बोलले, प्रशांतसोबत चर्चा कर. त्यानंतर प्रशांत यांच्या सांगण्यावरून पैसे दिले. बिट्टू भय्या यांच्यामार्फत ५०८ कोटी दिले. तरीही मला अडचणी येत आहेत. कोणाला किती पैसे व कधी दिले, याचा तपशील मी लेखी दिला. मी राजकीय यंत्रणेत फसलो आहे. मी भारतात येऊ इच्छितो, मला मदत करा, असे शुभमने सांगितले.