नवी दिल्ली : आरबीआयने ओळखपत्राविना दोन हजाराची नोट बदलण्यास अनुमती दिल्याच्या निर्णयाला आव्हान देणारी नवी दिल्लीतील वकील अश्विनी उपाध्याय यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
सरन्यायाधीय डी. वाय. चंद्रचूड व पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने आरबीआयचा निर्णय कार्यपालिकेचा निर्णय असून, त्यावर न्यायनिवाडा होऊ शकत नाही अशी टिप्पणी देऊन याचिका फेटाळून लावली आहे. २९ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने देखील अशीच याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाने आरबीआयने हा निर्णय नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी घेतला असून, तो एक धोरणात्मक निर्णय आहे. तेव्हा त्यात न्यायालय फेरफार करू शकत नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.