जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवायांमध्ये वाढ; लष्करी तळावरील हल्यात दोन अतिरेकी ठार, तीन जवान शहीद

अतिरेक्यांनी लष्करी तळावर शिरण्याचा प्रयत्न केला असता जवानांनी त्यांना रोखले.
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवायांमध्ये वाढ; लष्करी तळावरील हल्यात दोन अतिरेकी ठार, तीन जवान शहीद

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. काश्मीर खोऱ्यातील राजौरीपासून २५ किमी अंतरावरील एका लष्करी तळावर गुरूवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे ३ जवान शहीद झाले, तर २ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. ठार झालेले दोन्ही अतिरेकी आत्मघातकी हल्लेखोर होते. ते परगलस्थित लष्करी तळावर उरीसारखा भयंकर हल्ला करण्याच्या प्रयत्नांत होते. पण तत्पूर्वीच जवानांनी त्यांना कंठस्नान घातले.

हा हल्ला बुधवारी रात्री उशिरा दारहालच्या परगलमध्ये झाला. अतिरेक्यांनी लष्करी तळावर शिरण्याचा प्रयत्न केला असता जवानांनी त्यांना रोखले. यावेळी झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जवान शहीद झाले, तर लष्कराने २ आत्मघातकी हल्लेखोरांना यमसदनी पाठवले. हा हल्ला नेमका किती अतिरेक्यांनी केला व किती जण पळून गेले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण हल्ल्यानंतर जवानांनी जवळपास ६ किमी परिसराला घेराव घालून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. राजौरीतील परगल, दारहाल भागातील लष्करी छावणीचे कुंपण अतिरेक्यांनी ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जवानांनी त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. त्यात ३ जवान शहीद झाले तर २ जवान जखमी झाले आहेत. १८ सप्टेबर २०१६ रोजी काश्मीरच्या उरीमध्ये पहाटे ५ वाजून ४ मिनिटानी अतिरेक्यांनी लष्करी तळावर हल्ला केला होता. त्यांनी अवघ्या ३ मिनिटांत १५ हून अधिक ग्रेनेड फेकले. त्यात लष्कराचे १९ जवान शहीद झाले होते. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत ४ अतिरेकी मारले गेले होते. या हल्ल्यानंतर भारताने २८ सप्टेबर रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यात ३८ ते ४० अतिरेकी ठार झाले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in