आता पाकची आर्थिक कोंडी; ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानला आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यासाठी भारताने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मनी लाँड्रिंगविरोधी आणि दहशतवादाला आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याबद्दल भारत ‘एफएटीएफ’कडे जोरदार बाजू मांडणार आहे.
आता पाकची आर्थिक कोंडी; ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील
Published on

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्याचे ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानला आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यासाठी भारताने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मनी लाँड्रिंगविरोधी आणि दहशतवादाला आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याबद्दल भारत ‘एफएटीएफ’कडे जोरदार बाजू मांडणार आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आणखी एका मोठ्या कारवाईची तयारी केली आहे. पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये (करड्या यादीत) टाकण्यासाठी भारत ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’शी (एफएटीएफ) चर्चा करू शकतो. ‘एफएटीएफ’ एक जागतिक संघटना असून, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे हे तिचे काम आहे.

पाक अनेकदा ‘ग्रे लिस्ट’मध्ये

पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो दहशतवाद्यांना निधी पुरवतो. त्यामुळेच त्याला अनेक वेळा ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यात आले आहे. दहशतवाद निधीसाठी जून २०१८ मध्ये ‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकले होते, परंतु ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांनी पाकला ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर काढले. त्यापूर्वी २००८, २०१२ आणि २०१५ मध्येही पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यात आले होते.

जागतिक बँकेच्या निधीलाही भारताचा विरोध

भारत जागतिक बँकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीलाही विरोध करू शकतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) अलीकडेच पाकिस्तानला १ अब्ज डॉलरचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. भारताने त्यालाही कडाडून विरोध केला आहे. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी आता भारताने आपले शिष्टमंडळ तयार केले असून, ते विविध देशांमध्ये जाऊन पाकिस्तानची पोलखोल करणार आहेत. याशिवाय, पाकिस्तानला विविध जागतिक संघटनांकडून मिळणारी मदतही थांबवण्याचे भारत प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानने इंडिगो विमानाला हवाई हद्द वापरण्यास केली मनाई

दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगो विमानाला खराब हवामानाचा बुधवारी फटका बसला. या प्रतिकूल हवामानाविरोधात सामना करताना विमानातील कर्मचाऱ्यांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश मिळण्याची विनंती केली होती, मात्र पाकिस्तानने ही विनंती नाकारली, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

पाकिस्तानने भारताच्या इंडिगो विमानाला हवामानातील धोकादायक परिस्थितीत मदत करण्यास नकार दिला. बुधवारी संध्याकाळी दिल्लीतून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला अचानक गारपिटीचा सामना करावा लागला. त्यावेळी पायलटने लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे थोडा वेळ पाकिस्तानी हवाई हद्द वापरण्याची परवानगी मागितली होती, मात्र ही विनंती पाकिस्तानकडून नाकारण्यात आली. त्यामुळे पायलटने विमानाचे मूळ मार्गानेच उड्डाण सुरू ठेवले.

या विमानात २२७ प्रवासी होते. हवेतच गारपिटीचा जबरदस्त मारा झाल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. पायलटने तत्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर केली. विमान सायंकाळी ६.३० वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवासी व क्रू सदस्य सुखरूप बाहेर पडले. मात्र या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in