आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

२७ ऑगस्ट ते ३१ऑगस्ट या कालावधीत गट सामने आणि त्यानंतर सुपर-४ च्या संघांचे सामने ३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत होतील
 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार

येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी दुबईत एकमेकांशी भिडतील.

आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये होणार आहे. २७ ऑगस्ट ते ३१ऑगस्ट या कालावधीत गट सामने आणि त्यानंतर सुपर-४ च्या संघांचे सामने ३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत होतील. अंतिम सामना रविवार, ११ सप्टेंबर रोजी होईल. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबईत होणार आहे.

या संदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रतीक्षा अखेर संपली आहे. आशियातील क्रिकेट वर्चस्वाची लढाई २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होईल. आशिया चषकाची पंधरावी आवृत्ती ही आयसीसी टी-२० विश्वचषकापूर्वीची सर्वात आदर्श रंगीत तालीम ठरेल.” आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार होते; मात्र तेथील ढासळलेली राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती पाहून आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेतून यूएईमध्ये हलविण्यात आली.

हा निर्णय घेताना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह म्हणाले होते, “श्रीलंकेतील विद्यमान परिस्थिती लक्षात घेता, एसीसीने व्यापक विचारानंतर एकमताने ठिकाण बदलण्याचा निष्कर्ष काढला. स्पर्धा श्रीलंकेत होणार नसली तरी, श्रीलंकेकडेच यजमानपदाचे सर्व अधिकार असतील.”

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in